हैदराबाद : बलात्कार रोखण्यासाठी पाकिस्तानमधील कबरींवर लोखंडी जाळीचे कुलूप लावल्याचा दावा सोशल माध्यमात करण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेनेही याबाबत वृत्त प्रसारित केले होते. मात्र हा दावा सपशेल खोटा असल्याचे पुढे आले आहे. तो फोटो पाकिस्तानमधील नसून हैदराबादेतील असल्याचे फॅक्ट चेकमध्ये उघड झाले आहे. त्यामुळे बलात्कार टाळण्यासाठी पाकिस्तानमधील कबरीवर लोखंडी जाळी लावण्यात येत असल्याचा दावा खोटा निघाल्याने सोशल माध्यमात याबाबत तुफान चर्चा सुरू आहेत.
पाकिस्तानी लेखकाने केले होते ट्विट :'पाकिस्तानी पालक मुलींच्या कबरींना बलात्कार टाळण्यासाठी बंद करतात' या मथळ्यासह एएनआय न्यूज एजन्सीने 29 एप्रिलला एक वृत्त प्रसारित केले होते. मात्र हे वृत्त पाकिस्तानमधील वादग्रस्त नास्तिक लेखक हॅरिस सुलतानच्या ट्विटचा हवाला देत करण्यात आले होते. हॅरिस यांनी देखील हाच फोटो शेअर केला होता. पाकिस्तानमध्ये एक कबर आहे. पालकांनी त्यांच्या मुलींवर बलात्कार होऊ नये, म्हणून त्यांच्या कबरीवर कुलूप लावले आहे, असा दावा लेखक हॅरिस यांनी केला होता.
मूळ चित्र हैदराबादमधील कबरीचे :या फोटोत एक ग्रिल लॉक असलेली कबर दिसत आहे. पाकिस्तानी पालक त्यांच्या मुलींच्या अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी ही पद्धत वापरतात असा दावा या अहवालात करण्यात आला होता. एका वृत्तसंस्थेने वृत्त प्रसारित केल्यानंतर बराच गोंधळ उडाला. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे उघड झाले आहे. कबरीचे हे चित्र मूळचे हैदराबादचे असल्याचे समोर आले आहे. त्याचा दावा खोडून काढल्यानंतर हॅरिसने त्याचे ट्विट हटवले आहे.