नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, राज्यात बुधवारी, 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर शनिवारी, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
80 वर्षांवरील लोक घरून मतदान करू शकतील : राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटकात पहिल्यांदाच 80 वर्षांवरील लोक घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. अधिकाधिक तरुणांना मतदान करता यावे, यावर आयोगाचा भर असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की 1 एप्रिल 2023 पर्यंत 18 वर्षांचे तरुण देखील मतदान करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, कर्नाटकमध्ये 9.17 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. कर्नाटकातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण 58,282 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.
2018 ची विधानसभा : कर्नाटक विधानसभेत एकूण 224 सदस्य आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38.14 टक्के मते मिळाली होती. तर जेडीएसला 18.3 आणि भाजपला 36.35 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 80 आणि जेडीएसचे 37 उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले होते. निवडणुकीत भाजपला 104 जागांवर यश मिळाले होते. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस आणि जेडीएसने युतीचे सरकार स्थापन केले आणि त्यानंतर जेडीएस नेते कुमारस्वामी किंग मेकर बनले होते. मात्र काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार केवळ 14 महिनेच चालू शकले. युतीच्या सुमारे 19 आमदारांनी सरकारचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार पडले आणि येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले.