काबुल (अफगाणिस्तान)अफगाणिस्तानमधील भीषण भूकंपातील मृतांची संख्या आता 1000 च्या जवळ पोहोचली आहे. तालिबान सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 वर पोहोचली आहे. या घटनेत 600 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या पक्तिका आणि खोस्ट प्रांतातील दुर्गम भागात अद्यापही बचाव पथके पोहोचू शकलेली नाहीत. अशा परिस्थितीत या भूकंपामुळे मृतांचा आकडा लक्षणीय वाढणार असल्याचे मानले जात आहे. अनेक तालिबान अधिकार्यांनी स्वतः सांगितले आहे की भूकंपामुळे प्रभावित अनेक भागात मदत आणि बचाव पथके अजूनही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, बुधवारी पहाटे अफगाणिस्तानला भूकंपाचा धक्का बसला. रिअॅक्टर स्केलवर ते 6.1 मोजले गेले. (USGS)ने सांगितले की भूकंपाचा केंद्रबिंदू खोस्त शहरापासून 46 किमी अंतरावर पाकिस्तान सीमेजवळ होता. अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारमधील आपत्ती व्यवस्थापनाचे उपमंत्री मौलवी शराफुद्दीन मुस्लिम यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "आतापर्यंत आमच्याकडे किमान 920 लोक ठार आणि 600 जखमी झाल्याची माहिती आहे."