हैदराबाद - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता (Amrita Fadnavis ) यांनी गायिका म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या गायनाची आवड ही नेहमीच पाहायला मिळते. बऱ्याच गाण्यांना त्यांनी आवाज दिला आहे. आता त्यांचे नवे गाणे चाहत्यांसाठी प्रसिद्ध झालं आहे. ‘नारी, मनहारी...सुकूमारी' हे गाण्याचे बोल आहेत. हे गाणे इंटरनेट सेन्सेशन ठरलेल्या ‘मनिके मागे हिते’ ( Manike Maage Hite ) या गीतावर आधारीत असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं आहे. अमृताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने अतिशय सुंदर हे गाणे गायले आहे. अमृता फडणवीस या शास्त्रीय गायिका आहेत. तसेच त्या अॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्षा राहिल्या आहेत. अमृता नागपूरचे प्रसिद्ध गायक डॉ. चारू रानडे आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. शरद रानडे यांच्या कन्या आहेत. 1979 मध्ये जन्मलेल्या अमृताचे 2005 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशी लग्न झाले. दोघांना एक मुलगी असून तीचे नाव दिविजा आहे.
यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी अनेक गाणे गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे. यानंतर, त्यांनी ‘व्हॅलेंटाईन डे’च्या (Valentine’s day) मुहूर्तावर सोशल मीडियावर एक गाणे शेअर केले होते. ‘ये नयन डरे डरे’ असे या गाण्याचे बोल आहेत. तर गणेशोत्सवादरम्यान त्यांनी गणेश वंदना देखील गायली होती. अलीकडेच दिपावली निमित्त महालक्ष्मीची आरती घेऊन त्या सर्वांच्या भेटीला आल्या होत्या. विशेष म्हणजे या गाण्यात प्रसिद्ध गायक सोनू निगमची झलक पाहायला मिळाली.
काही दिवसांपूर्वी ‘मणिके मागे हिते’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याने नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांन वेड लावलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तर हे गाणं रात्री लूपवर ऐकलं असे त्यांनी सांगितलं आहे. हे गाणं योहानीने गायलं आहे. योहानी ही दाक्षिणात्य गायिका आहे. मात्र, ही गायिका भारतीय नसून श्रीलंकेची आहे. तिचं सोशल मीडियावर जे गाणं व्हायरल झालं आहे. ते गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेत नाही तर सिंहला भाषेतलं आहे.