नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज (16 ऑगस्ट) पुण्यतिथी आहे. जिंदादिल राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती. विशिष्ट पद्धतीची भाषणशैली आणि कवितांमुळेही ते प्रख्यात होते. ते संयमी राजकारणी होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टींवर प्रकाश टाकला.
सदैव अटल : अटलबिहारी वाजपेयींची आज पुण्यतिथी; त्यांच्याविषयी काही खास गोष्टी!
भारतीय राजकारणात महत्वपूर्ण योगदाने देणारे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. विशिष्ट पद्धतीची भाषणशैली आणि कवितांमुळेही ते प्रख्यात होते. ते संयमी राजकारणी होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने 'ईटीव्ही भारत'ने त्यांच्या आयुष्याशी निगडित काही खास गोष्टींवर प्रकाश टाकला.
अटल बिहारी वाजपेयी नावाप्रमाणेच एक ज्येष्ठ भारतीय नेते, निष्णात राजकारणी, निस्पृह सामाजिक कार्यकर्ते, बलवान वक्ते, कवी, साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात वाजपेयी यांनी भारत पाकिस्तान या देशामधील संबंध सुधारण्यासाठी अनेक मोलाचे प्रयत्न केले. 1996 मध्ये वाजपेयी पहिल्यांदा पंतप्रधान झाले होते. मात्र, त्यांचे सरकार त्यावेळी 13 दिवसच टिकले होते. तर पुन्हा 1998 मध्ये ते दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यावेळीही त्यांचे सरकार 13 महिनेच होते. 1999 मध्ये वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले. यावेळी त्यांनी 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.
16 ऑगस्ट 2018 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले होते. वाजपेयी यांनी 3 वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषविले आहे. वाजपेयी यांचा जयंती दिन 25 डिसेंबर हा दिवस 'गुड गव्हर्नन्स डे' म्हणून साजरा केला जातो. वाजपेयी यांना 2014 मध्ये देशातील सर्वोच्च सन्मान असलेला पुरस्कार भारतरत्नने गौरवण्यात आले होते.
- संयुक्त राष्ट्रात हिंदीत भाषण करणारे ते पहिले परराष्ट्र मंत्री होते.
- 2012 मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.
- राजकारणात यशस्वी होऊनही त्यांनी लग्न केले नव्हते. परंतु असे म्हटलं जात, की अटलजींच राजकुमारी कौल यांच्यावर प्रेम होते. अटल बिहारी वाजपेयींना कुणी अपत्य नाही, मात्र त्यांनी नमिता कौल हिला दत्तक मुलगी मानलं, तिला सांभाळलं. नमिता कौल यांचं लग्न रंजन भट्टाचार्य यांच्याशी झालं.
- मे 1998 मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली 5 अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही.
- अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.
- अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात द्विपक्षीय संबंध सुधारणाऱ्यावर भर दिला.
- 1998 च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले होते. पण सवयीप्रमाणे पाकिस्तानने दगाबाजी केली होती आणि कारगिल युद्ध झाले. ज्यात भारताने विजय मिळवला.
- 1996 च्या निवडणुकात वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी 13 दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर 1998 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार 13 महिने चालले.
- वाजपेयींना खाण्याचे शौकीन होते. ते स्वत:ही खायचे आणि दुसऱ्यांना आवडीने खाऊ घालायचे. ग्वाल्हेरमध्ये काही जागा आहेत, ज्याठिकाणी त्यांचे नेहमी जाणे व्हायचे. त्यातीलच एका दुकान म्हणजे बहादुरा स्वीट्स. नवीन बाजार परिसरात असलेले बहादुरा स्वीट्स दुकानातील लड्डू आणि रसगुल्ले वाजपेयींना खूप आवडायचे. इतकेच नाही तर पंतप्रधान बनल्यावर त्यांचे ग्वाल्हेरला येणे कमी झाले होते. यामुळे त्यांच्यासाठी विशेष पद्धतीने बहादुरा स्वीट्सचे लाडू आणि रसगुल्ले दिल्लीला पाठवले जात होते.
- ग्वाल्हेरमध्ये अटलजींचे मंदिर आहे. मंदिरात अटलजींची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. तसेच नित्यनेमाने सकाळी-संध्याकाळी त्यांच्या कविता आरती स्वरुपात म्हटल्या जातात. या मंदिरात एक पुजारी आहेत, जे सकाळी संध्याकाळ पूजा-अर्चना करतात.