शिमला (हिमाचल प्रदेश) : बौद्ध धर्मगुरू दलाई लामा सध्या एका लहान मुलाचे ओठांवर चुंबन घेतल्याप्रकरणी वादात सापडले आहेत. शांततेचा नोबेल पारितोषिक विजिते 14 वे दलाई लामा या आधीही अनेक वादात सापडले आहेत. 2019 मध्ये दलाई लामा यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यावेळीही त्यांच्या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती आणि त्यानंतर त्यांना माफी मागावी लागली होती.
महिलांबाबत दलाई लामांचे वक्तव्य : बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान भविष्यात महिला दलाई लामा होण्याच्या प्रश्नावर दलाई लामा म्हणाले होते की, महिला दलाई लामा होण्यासाठी तिचे आकर्षक असणे आवश्यक आहे. मुलाखतीदरम्यान, त्यांनी हसत हसत विनोदी स्वरात हे वक्तव्य केले होते. दलाई लामा यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर जगभरातून टीका झाली होती. दलाई लामा मुलाखतीदरम्यान पुढे म्हणाले होते की, हे अगदी खरे आहे की खरे सौंदर्य हे आंतरिक सौंदर्य आहे. पण एक माणूस म्हणून तुमचा देखावा किंवा बाह्य सौंदर्य देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
वाद वाढल्यानंतर मागितली माफी : या प्रकरणावरून दलाई लामांवर बरीच टीका झाली होती. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. या प्रकरणी स्पष्टीकरण सादर करताना दलाई लामा यांच्या कार्यालयाच्या वतीने माफीनामा जारी करण्यात आला होता. यामध्ये असे म्हटले होते की, 'अशा टिप्पण्यांचे संदर्भ वेगळे आहेत परंतु त्यांचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. यामुळे जे दुखावले गेले आहेत त्यांच्याबद्दल दलाई लामा दिलगीर आहेत आणि ते यासाठी मनापासून माफी मागतात'.
डोनाल्ड ट्रम्पबद्दलही दिले होते वक्तव्य : बीबीसीला दिलेल्या या मुलाखतीदरम्यान दलाई लामा यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, 'ट्रम्पमध्ये नैतिक तत्त्वांचा अभाव आहे. ते एका दिवशी एक गोष्ट सांगतात आणि दुसऱ्या दिवशी दुसरे काहीतरी बोलतात'. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्टचा नारा चुकीचा असल्याचे सांगून दलाई लामा म्हणाले होते की, अमेरिकेने आंतरराष्ट्रीय जबाबदारी स्वीकारली पाहिजे.
हेही वाचा :Red Fort Name Change : लाल किल्ल्याचे नाव बदलून भगवा किल्ला करा; हिंदू महासभेची मागणी