मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी भारतीय काँग्रेसचे देशाबाहेरील कामकाजासाठीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी केली आहे. पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसमध्ये व्यापक बदल व्हावे अशी आग्रही मागणी करणाऱ्या जी-23 समूहाचा भाग आहेत. चव्हाण हे वृत्तवाहिन्यांवरील चर्चेच्या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात बोलले असल्याचा आरोप वशिष्ठ यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्याबाबत चव्हाण हे खोटी माहिती देत आहेत - वशिष्ठ यांनी काँग्रेस पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष तारीक अन्वर यांना ईमेल पाठवला आहे. यामध्ये त्यांनी चव्हाण यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. वशिष्ठ यांनी लिहिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, की मला आपले लक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दिशाभूल करणाऱ्या विधानांकडे आकर्षित करायचे आहे. चव्हाण यांनी पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकांसंदर्भात ही विधाने केली आहेत. राहुल गांधी यांच्याबाबत चव्हाण हे खोटी माहिती देत आहेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी मी मागणी करत आहेत.
आझाद यांना पक्ष सोडल्यानंतर भेटले - गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी 30 ऑगस्ट रोजी त्यांची भेट घेतली होती. चव्हाण यांच्यासोबत हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुडा आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा हे देखील होते. आझाद यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका करत पक्ष सोडला होता. राहुल गांधी हे अपरीपक्व असून त्यांच्यामुळे पक्षातील चर्चेची यंत्रणा कोलमडल्याचे आझाद यांनी म्हटले होते. ही टीका करणाऱ्या आझाद यांना पक्ष सोडल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन भेटणे हे काँग्रेसमधल्या काही नेतेमंडळींना आवडलेले नाही अशीही जोरदार चर्चा आहे.
नेतृत्वाला दोष देत आपली नाराजी बोलून दाखवली - आझाद यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसमधून उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी गुलामनबी आझाद यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आझाद यांनी पक्ष सोडण्यामागे काँग्रेस नेतृत्वाला दोष देत आपली नाराजी बोलून दाखवली आहे त्यावरूनही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
हेही वाचा -गर्भाशय कर्करोगावर लसीच्या किमतीबाबत अदर पूनावालांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...