पणजी -केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित 28 व्या ‘हुनर हाट’चे उद्घाटन आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस हार्दिक, राज्यसभा सदस्य विनय तेंडुलकर, गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्यासह केंद्रीय अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयाचे सचिव पी.के. दास आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ सावंत म्हणाले, ‘हुनर हाट’ मुळे देशासोबत गोव्यातील कारागिरांनाही मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. जास्तीत जास्त लोकांनी हुनर हाटला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे. अशा उपक्रमामुळे कला आणि संस्कृतीचे आदानप्रदान होण्यास मदत होते. देशाची संस्कृती आणि एकता टिकवून ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे. ‘हुनर हाट’ हा स्थानिक कलाकार, कारागीर आणि व्यवसायाशी निगडीत यशस्वी उपक्रम असल्याचे केंद्रीय अल्पसंख्याक खात्याचे मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. ‘हुनर हाट’मुळे आतापर्यंत साडेपाच लाख लोकांना रोजगार आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले. ‘हुनर हाट’ हा स्वदेशी कलाकारांना प्रोत्साहन देणारा मंच आहे. देश स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करताना हुनरहाटच्या माध्यमातून 7 लाख 50 हजार कारागीरांना रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.
स्वदेशी कलात्मक आणि हस्तकला उत्पादनांच्या 28 वा ‘हुनर हाट’ उपक्रम गोव्यात आयोजित करण्यात आला असून, तो 4 एप्रिलपर्यंत सुरू राहील. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, चंदीगड, दिल्ली, गोवा, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, नागालँड, ओडिशा, पुडुचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्किम, तमिळनाडू, तेलंगणा, त्रिपुरा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांतल्या कारागीरांच्या स्वदेशी आणि हस्तकलेचे दर्शन घडवणाऱ्या अनोख्या वस्तू आणि उत्पादने या ‘हुनर हाट’ मध्ये विक्री आणि आणि प्रदर्शनासाठी उपलब्ध आहेत.
हेही वाचा -बंगालमधील भाजपा कार्यकर्त्याच्या आईचा मृत्यू; तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप