नवी दिल्ली -राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असतानाच नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारबरोबरच पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर टीका केली. शेतकरी आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीतील ९ स्टेडियमचे तात्पुरत्या तुरुंगात रुपांतर करण्यास परवानगी न दिल्याने केंद्र सरकार माझ्यावर नाराज असल्याचे केजरीवाल म्हणाले.
मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी खालच्या दर्जाचे राजकारण करू नये
केंद्र सरकारने पास केलेले तीन कृषी कायदे दिल्लीत लागू केल्याची टीका अमरिंदर सिंग यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केली होती. याला केजरीवाल यांनी उत्तर दिले. 'आज संपूर्ण देश पाहतोय शेतकरी थंडीमध्ये खुल्या आभाळाखाली आणि उघड्यावर झोपतायेत. हे पाहून कोणालाही झोप येत नाहीये. अशा नाजूक स्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग खालच्या दर्जाचे राजकारण करत आहेत. काल ते म्हणाले, आम्ही दिल्लीत केंद्राचे तीन काळे कायदे लागू केले, हा आरोप खोटा आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.