नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) सहसंचालक मनोज शशिधर यांना स्वतंत्रता दिनानिमित्त विशिष्ट सेवेसाठी पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. शशिधर यांची निर्भिड आणि इमानदार पोलीस अधिकारी अशी ओळख आहे. शशिधर हे गुजरात कॅडरचे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. विशेष म्हणजे, शशिधर यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रकरणाचा तपास केला आहे.
हेही वाचा -हमारी अधुरी कहानी.. प्रेमीयुगुलाची आत्महत्या, कारमध्ये बसून कारला लावली आग
शशिधर यांची जानेवारी २०२० साली सीबीआयच्या सहसंचालक पदावर नियुक्ती झाली होती. या नियुक्तीला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिली होती.
..या प्रकरणांचा केला आहे तपास
शशिधर यांनी ३ हजार ६०० कोटी रुपयांचा अगस्ता वेस्टलँड व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर करार, विजय माल्या बँक फसवणूक प्रकरण, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एनसीपी) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांचे प्रकरण, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सारख्या काही मोठ्या प्रकरणांचा तपास केला आहे. शशिधर यांनी अलीकडेच एका रेल्वे अधिकाऱ्याकडून एक कोटी रुपयांच्या वसुलीचे प्रकरण उघड केले होते.