वाराणसी- जिल्ह्यातील 28 वर्षीय स्वतंत्र पत्रकार रिजवाना तबस्सुमने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या खोलीतून एक सुसाईड नोट सापडली. ज्यात समाजवादी पक्षाचे नेते शमीम नोमानी यांचा उल्लेख होता. यानंतर तरुणीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी नोमानीला अटक करण्यात आली आहे.
या आत्महत्येसाठी शमीम नोमानी कारणीभूत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले गेले आहे. रिजवानाने सोमवारी वाराणसी जिल्ह्यातील हरपालपूर येथे आत्महत्या केली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय त्रिपाठी यांनी सांगितले, की शमीमला अटक करण्यात आली असून सोमवारी रात्री त्याची चौकशी केली गेली. तर, रिजवानाच्या शवविच्छेदनानंतर तिचा मृत्यू फासावर लटकल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर, पोलीस अधिकारी अभिषेक पांडे यांनी सांगितले, की तबस्सुमच्या वडिलांच्या तक्रारीवरून लोहटा रहिवासी नोमानीविरोधात कलम 306 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी नोमानीला ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
शमीम आणि रिजवाना हे गेल्या अनेक दिवसंपासून चांगले मित्र होते. मात्र, अचानक त्यांच्यात असे काय घडले, याबद्दल कोणालाही माहिती नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी बराच वेळ रिजवाना तिच्या खोलीच्या बाहेर आली नाही. आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा तोडल्यानंतर तब्बसूमचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला.
रिजवानाच्या वडिलांनी सांगितले, की तिने आम्हाला याबद्दल काहीही सांगितले नाही आणि तिचे कोणी शत्रूही नव्हते. ती एक उत्तम मुलगी आणि चांगली पत्रकार होती. तिने बनारस हिंदू युनिवर्सिटीमधून मास कम्युनिकेशन केले होते. सध्या ती अनेक पोर्टल आणि पब्लिकेशनसाठी स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करत होती.