अहमदाबाद - गुजरात राज्यातून नारी शक्तीची आणखी एक कहाणी पुढे आली आहे. जर तुम्हाला जीवनात काही मिळवायचे असेल तर कॉलेजची डिग्री नाही तर तुमच्यातील कौशल्य तुम्हाल यश मिळवून देते. हे विमलबेन रावल यांच्या प्रवासातून दिसून येते.
विमलबेन यांनी सातवीतून शाळा सोडली आणि वयाच्या तेराव्या वर्षापासून भाजी विक्रीचा व्यवसाय सुरु केला. सुरवातीला त्या हातगाडीवरून भाजी विकायच्या. अल्पावधीतच त्यांनी भाजी विक्रीचे दुकान सुरु केले.
कॉलेजची डिग्री नव्हे तर, कौशल्य तुम्हाला यश मिळवून देते काही दिवसानंतर त्यांची छोटीशी गुंतवणूक फळाला आली. आता त्या महिना एक लाख रुपये कमावतात. दुकान सुरू केल्यानंतर काही दिवसांतच त्यांनी घर विकत घेतले.
विमलबेन प्रत्येक काम वेळेवर करतात. सकाळी ४ वाजता उठून त्या अहमदाबादेतील जमालपूर आणि कलापूर येथील भाजी मंडईत जाऊन भाजी खरेदी करतात. व्यवसायाचा वाढता व्याप पाहता त्यांनी आता भाजी आणण्यासाठी एक मिनी ट्रक खरेदी केला आहे. विमलबेन यांचा मुलगा आणि सुनही या व्यवसायात त्यांना मदत करतात.
विमलबेन यांचे भाजी व्यवसायतून मासिक उत्पन्न १ लाख ते १ लाख २५ हजार आहे. त्यांच्याकडे पॅनकार्ड असून त्या नियमितपणे इनकम टॅक्सही भरतात. जर तुमच्यात कौशल्य असेल तर तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज नाही. तुम्ही यशस्वी होऊ शकता हे विमलबेन यांच्या प्रवासातून दिसते. त्यांच्या सारख्या महिला लाखो महिलांना प्रेरणा देत राहतील.