लखनौ- कुख्यात गुंड विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळण्यासाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी 25 पथके तयार केली आहेत. पोलिस पथकावर गोळीबार होऊन 36 तास उलटले तरी दुबे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. काल (शुक्रवारी) रात्री कानपूरमध्ये विकास दुबेला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता त्याने साथीदारांच्या मदतीने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी शहीद झाले. तर सातजण जखमी झाले आहेत. या प्रकरणावरून राज्यभर खळबळ उडाली आहे.
पोलीस कर्मचारी दुबेच्या संपर्कात
गुंड विकास दुबेच्या संपर्कात अनेक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. फोन कॉलच्या आधारे या पोलीस कर्मचाऱ्यांना शोधण्याचे काम पोलीस करत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रथम दिले होते. या प्रकरणी काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावे समोर आली असून तपास सुरु आहे.
विकास दुबेला काही पोलिसांचे फोन आल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलीस 500 पेक्षा जास्त मोबाईलची माहिती तपासत आहेत. त्यातून दुबेची काही मिळते का? हे पाहण्याचा प्रयत्न सुरु आहे. विकास दुबेवर याआधी 60 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे, असे पोलीस सुत्रांनी सांगितले. गुंड विकास दुबे आणि गोळीबारात शहीद झालेल्या पोलिसांबाबत सोशल मिडियातून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, दुबेच्या अटकेचे वृत्त आणि अफवा पोलिसांनी खोटे असल्याचे सांगितले.
काय आहे घटना?
कानपूर जिल्ह्यातील बिकारु गावात राहणारा विकास दुबे हा कुख्यात गुंड असून पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री 12 नंतर गेले होते. पोलीस येत असल्याची त्याला माहिती मिळाली असावी. म्हणून तो आणि त्याचे साथीदार पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते.
घराच्या गेटसमोर त्याने जेसीबी आणून उभे केले होते. तसेच त्याचे साथीदार बंदुका घेवून छतावर थांबले होते. पोलीस पथक गेटवर येताच गुंडांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये आठ पोलीस शहीद झाले. तर सात जण जखमी झाले. या घटनेनंतर विकास दुबे साथीदारांसह घटनास्थळावरून पळून गेला. दुबे हा कुख्यात गुंड असून त्याचे राजकारणी आणि पोलिसांशीही संबध होते, अशी माहिती मिळत आहे.