वर्धा - लकी ड्रॉ लागला म्हणून विविध कारणासाठी पैसे मागवत फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका बनावट कॉल सेंटरवर वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. दिल्लीच्या ओखला इंडस्ट्रियल परिसरात ही कारवाई करत 6 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच २ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर पूर्णतः शोध घेत अटक करण्यात यश आले आहे.
या कॉल सेंटरच्या माध्यमातून जवळपास दोन कोटींचे व्यवहार झाले असून देशभरात फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. राहुल सुजन सिंग यादव वय २२, उत्तर प्रदेश, पंकज जगदीश राठोड वय २८, संगम विहार दिल्ली, या दोघांना अटक केली.
वर्ध्यातील रामनगर पोलीस स्टेशन येथे ऋषभ कैलास करंडे यांना लकी ड्रॉमध्ये नंबर लागली म्हणून केटीएम मोटर मोटरसायकल लागल्याचे सांगण्यात आले. यासाठी विविध कारणांनी जवळपास ३ लाख ६० हजार रुपये भरून घेतले. पैसे देऊन गाडी न मिळाल्याने त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलीस जानेवारी महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली आणि अप्पर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा शोध सुरू करण्याचे निर्देश दिले. फसवणुकीचे धागेदोरे दिल्ली येथील ओखला परिसरातील इंडस्ट्रियल एरिया मध्ये एका कॉल सेंटरच्या माध्यमातून चालत असल्याची माहिती तपासात पुढे आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने ७ दिवस दिल्ली येथे ओखला परिसरात पिंजून काढल्यानंतर देशभरात फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर पर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. त्यानंतर वर्ध्यातील गुन्ह्यात याच सेंटरद्वारे फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कॉल सेंटरवर १० ते १५ मुल - मुली काम करत असल्याच दिसून आले. पीआर इंटरप्राइजकडून फॅशन विला नावे फसवणूक होत असे. सुरुवातीला दोन-तीन वस्तूचा कॉम्बो पॅक फॅशन विला कंपनीच्या माध्यमातून दिला जात असे. एकदा वस्तू मिळाल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला म्हणून वस्तू किंवा कार बाईक पाठवण्यासाठी पैसे मागत. कर भरायला, टोल टॅक्स, कुरियर, असे विविध कारणे सांगत पैसे उकळत असे. अडीच लाखाच्या बाईकसाठी जवळपास ३ लाख ६० हजार रुपये घेण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.