हैदराबाद (तेलंगणा) - तेलंगणा काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे. हैदराबादमधील इंदिरा भवनमध्ये तेलंगणा प्रदेश काँग्रेस समितीची शुक्रवारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत दोन नेत्यांचे समर्थक आपआपसात भिडले. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचेही काँग्रेस नेत्यांना भान राहिले नाही.
काँग्रेसच्या बैठकीत गटबाजीतून दोन गटात हाणामारी; सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन
हैदराबाद महापालिका निवडणुक तयारीच्या दुसऱ्या बैठकीतही काँग्रेसमध्ये गटबाजी दिसून आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियमाचे भान विसरून दोन्ही गटाच्या समर्थकांनी हाणामारी केली.
हैदराबाद महापालिका निवडणुकीची तयारी करण्यासाठी ८ सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते डॉ. श्रवण आणि निरंजन यांच्यामध्ये वादावादीचा प्रसंग उद्भवला होता. विशेष म्हणजे हा प्रकार तेलंगाणा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी यांच्या समोरच घडला होता. हैदराबादच्या निवडणुकीची तयारी करण्यासाठी इंदिरा भवनमध्ये शुक्रवारी दुसरी बैठक बोलाविण्यात आली. यावेळी जिल्हा, शहर, प्रभाग अशा पातळीवरील काँग्रेसचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहिले. या समितीचे अध्यक्षस्थानी तेलंगणा प्रदेश समितीचे अध्यक्ष आणि खासदार कॅप्टन उत्तम कुमार रेड्डी होती. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा दोन नेत्यांमध्ये वाद झाला. हा वाद काँग्रेस नेते फिरोज खान आणि मोहम्मद गौस यांच्यात झाला. या वादानंतर दोन्ही नेते आणि त्यांचे समर्थक आपआपसात भिडले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक अंतर राखणे व मास्क घालणे अशा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. खूप वेळ हा वाद सुरू राहिल्यानंतर उत्तम कुमार रेड्डी यांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण आणले.