जम्मू -सुरक्षा दलांनी शुक्रवारी राजौरी जिल्ह्यात दहशतवाद्यांचा छुपा अड्डा उद्ध्वस्ता केला. तेथून शस्त्रे आणि दारुगोळा यांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यातस्वयंचलित रायफल, पिस्तूल यांच्यासह स्फोटकांचा समावेश होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुप्त माहितीच्या आधारे, जम्मू-काश्मीर पोलीस आणि 38 राष्ट्रीय रायफल्सने मुघलानजवळील घनदाट जंगलात संयुक्तरित्या कारवाई केली. हा अड्डा भूमिगत आणि दगडांच्या सहाय्याने केला होता , असे राजौरीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) चंदन कोहली म्हणाले.
हेही वाचा -मुंगेर हिंसाचार : सीआयएसएफच्या अहवालानुसार स्थानिक पोलिसांचा प्रथम गोळीबार
जप्त करण्यात आलेला साठा -
या छुप्या अड्ड्यावरून दोन एके-रायफल, दोन एके मॅगेझिन्स, रायफल्सच्या 270 गोळ्या, दोन चिनी बनावटीच्या पिस्तूल, दोन पिस्तूल मॅगझिन्स, 75 पिका राउंड, 12 ब्लँक राऊंड, 10 डिटोनेटर्स आणि पाच ते सहा किलो स्फोटके साहित्य जप्त करण्यात आले आहेत, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दल या भागात शोध घेत आहे. तसेच याप्रकरणी मांजाकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एसएसपीने सांगितले.