पीलीभीत: उत्तर प्रदेशातील पीलीभीतच्या पूरनपुर कोतवाली भागात बस आणि बोलेरो दरम्यान जोरदार टक्कर झाली आहे. या अपघातानंतर बस पलटी झाली, तर बोलेरे गाडीच्या चिंधड्या उडाल्या. दोन्ही वाहनांमधील 9 प्रवासी ठार झाले, तर 40 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
यापैकी 11 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात नेले जात आहे. पीलीभीत पोलीस अधीक्षक जयप्रकाश यादव यांच्यासह अनेक उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान, पीलीभीत पोलीस अधीक्षक जयप्रकाश यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, प्रवाशांना वाचवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे, त्यामुळे पोलीस सतत काम करत आहेत. बस व बोलेरोमध्ये उपस्थित प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असुन जखमींवर उपचार सुरू आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली
जखमींना रूग्णालयात नेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचीप्रकृती अचानक खालावली आहे. अचानक रक्तदाब वाढल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून पोलीस कर्मचाऱ्याला तातडीने पीलीभीत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पीलीभीतचे पोलिस अधीक्षक जयप्रकाश यादव यांनी सांगीतले.