लखनौ - बहुतांश सर्वच क्षेत्रात खासगीकरण होत असताना रेल्वे सेवा अजूनही संपूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली आहे. मात्र लखनौ ते दिल्लीदरम्यानची तेजस एक्स्प्रेस सरकार खासगी कंपनीला चालविण्यासाठी देणार आहे. ही देशातील पहिली खासगी रेल्वे असणार आहे.
रेल्वेच्या खासगीकरणाला काही संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तरीही रेल्वेने १०० दिवसीय मोहीम या कार्यक्रमांतर्गत दोन रेल्वे खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली-लखनौ या तेजस एक्स्प्रेस रेल्वेची २०१६ मध्ये घोषणा करण्यात आली होती. या रेल्वेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
असे असणार रेल्वेचे वेळापत्रक -
तेजस एक्स्प्रेस (रेल्वे क्रमांक १२५८५) ही लखनौच्या रेल्वे स्टेशनमधून सकाळी ६ वाजून ५० मिनिटाला सुटणार आहे. तर नवी दिल्लीला दुपारी १.३५ मिनिटाला पोहोचणार आहे. परतीच्या मार्गावर (रेल्वे क्रमांक १२५८६ ) ही नवी दिल्लीहून दुपारी ३.३५ ला सुटणार आहे. तर लखनौला रात्री १० वाजून ५ मिनिटाला पोहोचणार आहे. ही रेल्वे रविवार आणि गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी धावणार आहे. ही रेल्वे सध्या आनंदनगर रेल्वे स्थानकात आहे. ती खुल्या निविदेच्या प्रक्रियेनंतर खासगी कंपनीकडे देण्यात येणार आहे.