नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भारतात कोरोनाचा प्रसार होऊन सहा महिने झाले आहेत. येत्या काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगढमध्ये पोट निवडणुका तर बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांचा राजकीय रंग सण-उत्सवांना चढल्याचे पाहायला मिळत आहे. मतांवर प्रभाव पडू नये म्हणून या राज्यात कोरोनाचा प्रसार असूनही उत्सवांना ढिल देण्यात आली आहे.
कोरोनाचा प्रसार असूनही उत्सवांना मोकळीक; वाचा कोणत्या राज्यात काय नियम..
निवडणुकांचा राजकीय रंग सण-उत्सवांना चढल्याचे पाहायला मिळत आहे. मतांवर प्रभाव पडू नये म्हणून या राज्यात कोरोनाचा प्रसार असूनही उत्सवांना ढिल देण्यात आली आहे.
सण-उत्सवांवर कोरोनाचा परिणाम
येत्या 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान नवरात्री, दुर्गापूजा, विजयादशमी (दसरा) हे सण साजरे होणार आहेत. सरकारने नवरात्र आणि दसरा या सणासाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. दुर्गा मुर्ती, रावणाच्या पुतळ्याची उंची, मंडपाचे क्षेत्र आणि लोकांची संख्या यांचा मार्गद र्शक सूचनात समावेश आहे. राज्यानुसार या नियमांमध्ये बदल पाहायला मिळाला आहे.
महाराष्ट्र -
- कोरोनामुळे यंदा गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी पडले. त्यापाठोपाठ नवरात्रोत्सवदेखील साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. या वर्षी शक्यतो पारंपरिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे.
- मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
- देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाइन, संकेतस्थळ वा फेसबुक आदी माध्यमातून उपलब्ध करावी.
- दुर्गा मंडपात एकाचवेळी 5 पेक्षा जास्त लोकांनी उपस्थित असू नये.
- कोणीही समितीने सार्वजनिकरित्या प्रसादाचे वाटप करू नये. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास मनाई आहे.
- दुर्गा मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.
- दुर्गादेवी व लक्ष्मी मातेची मूर्ती 4 फुटापर्यंतच असावी व या नियमाचा भंग झाल्यास मूर्तीकाराला 15 हजार रु. दंड ठोठवण्यात येणार.
- गरबा, दांडिया आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यास प्रतिबंध
- विसर्जनाच्या वेळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
- नवरात्रोत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही हे पाहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या मोहिमेबाबतदेखील जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
- महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाने मूर्तीकार नाराज झाले आहेत. राज्यात चार फुटांच्या मूर्तींची अट कायम असल्याने मूर्तीकारांचे आर्थिक चक्र रुळावर येण्यात अडसर आला आहे. विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यातून देवीच्या मूर्तींचे ऑर्डर नागपुरातील मूर्तीकारांना मिळतात. तेथून सात ते आठ फुटांच्या मूर्तींचे ऑर्डर मिळू लागले आहेत. त्यामुळे आपल्याच राज्यात चार फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींना परवानगी का नाही, असा प्रश्न मूर्तीकारांना पडला आहे. मध्य प्रदेशमध्ये जर 7 फूटाची मुर्ती वापरण्यास परवानगी आहे. तर महाराष्ट्रात का नाही, असा सवाल मुर्तीकारांनी केला आहे.
- माजी कृषिमंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी दुर्गादेवीच्या उंचीची मर्यादा 4 फुटावर वरून 7 फुटावर करण्यात यावी व मूर्तीकारवरील अन्याय दूर करण्यात यावा, अशी मागणी केली.
गुजरात -
- गरबा आयोजीत करण्यास बंदी.
- एका ठिकाणी 200 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई.
- वयोवृद्ध आणि लहान मुलांना कार्यक्रमापासून दुर ठेवावे.
- यात्रा, रॅली, रावण दहन, रामलीला, शोभयात्रा सारख्या सामूहिक कार्यक्रमांवर बंदी.
- नियमांचे उल्लघंन केल्यावर मंडप संचालकाविरोधात कायदेशीर कारवाई.
मध्यप्रदेश -
- मध्यप्रदेशमध्ये नवरात्र आणि दसरा या दोन्ही उत्सावांना राजकीय रंग देण्यात येत आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी सूट दिल्याने माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंहवर निशाणा साधला आहे. 18 सप्टेंबरला मध्य प्रदेश सरकारने नवरात्रोत्सवासाठी नियमावली जारी केली होती. मात्र, त्यावरून गोंधळ निर्माण झाल्यानंतर पुन्हा 3 ऑक्टोबरला नियमावलीत बदल करण्यात आला.
- दुर्गा मंडपाची लांबी आणि रुंदी 10X10 वरून 30X40 करण्यात आली आहे.
- दुर्गा मंडप समितीच्या 10 जणांना मुर्ती विसर्जनावेळी उपस्थित राहण्याची परवानगी.
- गरबा आयोजीत करण्यास परवानगी नसणार.
- दसरा उत्सवात रामलीला आणि रावणाचे दहन करण्यास परवानगी.
- सर्व कार्यक्रमात मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक.
छत्तीसगढ -
- मूर्तींची लांबी आणि रुंदी 6X5 फूटापेक्षा जास्त नसावी.
- मूर्ती मंडपाची लांबी आणि रुंदी 15X15 पेक्षा जास्त नसावी.
- दुर्गा मंडपासमोर कमीत-कमी 2 हजार फूट खाली जागा असावी.
- एकाच वेळी मंडपात 20 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
- दुर्गा मंडपात गेल्याने जर एखाद्या व्यक्तीस कोरोनाची बाधा झाली. तर त्याच्या उपचाराचा सर्व खर्च मूर्ती स्थापीत करणारा किंवा संबधित मंडप समितीने करावा.
- मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. तसेच मंडपामध्ये निर्जंतुकीकरण व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी.
- मूर्ती विसर्जनावेळी एकापेक्षा जास्त वाहने असू नयेत.
- रावण दहनासाठी पुतळ्याची उंची ही 10 फुटापेक्षा जास्त असू नये.
- पुतळ्याचे दहन खुल्या जागेत करावे. तसेच पुतळा दहन कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी सहभागी होऊ नये.
- ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदीचे पालन करावे.