पालमपूर (हिमाचल प्रदेश) - चहा हे ब्रिटिशांचे पेय मानले जात असले तरी तसे नाही. त्याचे मूळ प्राचीन चीनशी जोडले जाते. ख्रिस्तपूर्व 30 वे शतक ते ख्रिस्तपूर्व 21 वे शतक या काळात कधीतरी चीनमध्ये चहाचा शोध लागल्याचे सांगितले जाते. मात्र, आज जगभरात मोठ्या प्रमाणात आपल्याला चहाचे चाहते दिसून येतात. अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहापासूनच होते. भारतातही मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन घेतले जाते. भारतातील चहाचे दार्जिलिंग टी, आसाम टी, निलगिरी टी, कांगडा टी असे अनेक लोकप्रिय प्रकार आहेत. यातीलच प्रसिद्ध अशा कांगडाच्या चहाबद्दल आज आपण बोलणार आहोत.
हिमाचल प्रदेशातील कांगडा भाग चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात 1850 पासून चहाचे उत्पादन घेतले जाते. हिरवा आणि काळ्या रंगाची चहा येथे पिकवली जाते. कांगडा टी हा प्रकारदेखील दार्जिलिंग आणि आसाम टीप्रमाणे अतिशय लोकप्रिय आहे. या प्रदेशातील कांगडा आणि मंडी जिल्ह्यात सुमारे 2 हजार 63 हेक्टर क्षेत्रावर कांगडा चहाचे उत्पादन घेतले जाते. येथे चहा लागवडीची सुरुवात इंग्रजांनी केली. त्यांनी हा चहा चीनवरून आणून इथं लावला त्यामुळं या चहाला 'चायनीस हायब्रिड टी' असेही म्हटले जाते.