जयपूर -गेल्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधून आलेल्या हिंदू शरणार्थींना काही अटींनुसार भारतीय नागरिकत्व देण्याची घोषणा केली. यापूर्वीच काही पाकिस्तानी हिंदू सीमालगतच्या राज्यांमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही सरकारचा एकही अधिकारी त्यांना मदत करण्यासाठी पोहोचलेला नाही.
लॉकडाऊन इफेक्ट : घरात खायला अन्न नाही, आम्ही जगायचे कसे?, जयपुरातील पाकिस्तानी हिंदू शरणार्थींचे हाल घरात खायला अन्नही नाही...
पाकिस्तान येथील रहेम यार जिल्ह्यामधून राजस्थानमध्ये हिंदू शरणार्थी कुटुंब स्थायिक झाले आहे. घरात पत्नी आणि दोन मुले आहेत. ते रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. कमावले नाहीतर खायला अन्न मिळत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. त्यात लॉकडाऊन सुरू असल्यामुळे त्यांची स्थिती आणखी बिकट झाली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
जयपूर शहरातील मानसरोवर, गोविंदपुरा आणि पालडी मीणा या भागात पाकिस्तानमधून आलेले हिंदू शरणार्थींचे जवळपास १०० कुटुंब आहेत. सर्वजण रोजंदारी करून आपले पोट भरत असतात. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात जवळ असलेल्या थोड्या पैशांमध्ये उदरनिर्वाह केला. मात्र, आता सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले आहे आणि जवळचे पैसेही संपले आहे. त्यामुळे पोट कसे भरायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
एका संस्थेने रेशन पुरवले. त्यामध्ये १५ दिवस उदरनिर्वाह झाला. त्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत संपर्क साधला. त्यांनी जयपूरमध्ये असलेल्या पाकिस्तानी हिंदू शरणार्थींची यादी मागितली. त्यानंतर काही अधिकाऱ्यांनी एक-दोन दिवस फोनवरून परिस्थिती विचारली. मात्र, उपासमारीचा प्रश्न सुटला नाही.