कोरोना विषाणूचा परिणाम संपुर्ण जगावर झाला आहे. अशावेळी सार्वजनिक आरोग्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. चीनमध्ये 1 डिसेंबर 2019 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत या विषाणूचा प्रसार सुमारे 200 देशांमध्ये व भागांमध्ये झाला आहे; सुमारे 6 लाख व्यक्तींना या विषाणूचा संसर्ग झाला असून त्यापैकी एक टक्का लोक मृत्युमूखी पडले आहेत. मानवी इतिहासात आतापर्यंत कोणत्याच रोगाचा प्रसार एवढ्या वेगाने एवढ्या ठिकाणी झालेला नाही किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना रोगाची लागण झालेली नाही.
या रोगाला वैद्यकीय प्रतिसाद दिला जात आहे, मात्र हा प्रतिसाद एक ते 10 टक्के लोकसंख्येपुरता मर्यादित आहे. वैद्यकीय युद्धापलीकडे, यामुळे जगभरात, देशांमध्ये, शहरांमध्ये आणि आता घरांमध्येदेखील लोकांच्या हालचालींवर परिणाम झाला आहे. त्याचप्रमाणे, वस्तू आणि सेवांवरदेखील परिणाम झाला आहे. का बरे जगातील सुदृढ दिसणाऱ्या 90 टक्के लोकसंख्येस घरी बसण्यास सांगण्यात आले आहे? स्वतःला समाजापासून वेगळे ठेऊन आपण कसे योगदान देत आहोत? अशावेळी, रुग्णांपलीकडे लोकांचा सहभाग असलेले सार्वजनिक आरोग्य प्रकाशात येते.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ होत असते, ती/तो आरोग्य सेवा पुरविणाऱ्याकडे जाते, रोगाचे निदान करुन घेते, औषधे घेते आणि जशी सांगण्यात आली आहे, तशी काळजी घेते. याचाच परिपाक म्हणून ती व्यक्ती बरी होते. वैयक्तिक रुग्णांसाठी या वैद्यकीय सुविधांच्या प्रवासात वैद्यकीय आणि अर्ध-वैद्यकीय कर्मचारी सहभागी असतात. दुसरीकडे, सार्वजनिक आरोग्यामध्ये अनेक लोक हे अनेक लोकांसाठी नियोजित पद्धतीने प्रयत्न करतात. हा प्रकार रुग्णांच्या सेवेच्या तुलनेत वेगळा आहे. आजार आणि अपघातांच्या शक्यतांपासून लोकसंख्येचे संरक्षण करण्यासाठी हे प्रयत्न केले जातात आणि संपुर्ण लोकसंख्या शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या सुदृढ राहील याची खात्री केली जाते. यासाठी आरोग्य निर्धारकांच्या अधिक व्यापक आणि सखोल माहितीची गरज असते.
कोरोना विषाणू प्रकरणात, सार्वजनिक आरोग्य प्रयत्नांमध्ये पुढील प्रयत्नांचा समावेश होतो - अ) ज्ञानात भर घालून जागरुकता निर्माण करणे जेणेकरुन लोकांच्या वर्तनात बदल घडून येतील ब) संभाव्य जागांचे निर्जंतुकीकरण करुन, संभाव्य लोकांनी वारंवार हात धुऊन, सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनज्वारे हालचालींवर बंधन घालून संक्रमणाची शक्यता कमी करणे क) संशयित व्यक्तींची ओळख पटवणे आणि त्यांना इतरांपासून वेगळे ठेवणे ड) बाधित रुग्णांवर विलगीकरण(क्वारंटाईन) आणि उपचार ई) प्रभावित किंवा बाधित कुटुंबांवर होणारा सामाजिक आणि आर्थिक परिणाम कमी करणे. दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये व्यक्तींना देण्यात येणाऱ्या उपचारांपलीकडे हे प्रयत्न आहेत. आणि बिगर-वैद्यकीय व्यक्तींनी नियोजित प्रयत्नांद्वारे संपुर्ण समाजासाठी करणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणूचा पुढील काही गोष्टींशी अत्यंत मनोरंजक संबंध आहे - अ) स्थलांतर आणि शहरीकरणासंदर्भात लोकसंख्या आणि विकास ब) उत्पन्नात नुकसान, रोगनिदान आणि उपचारावर आर्थिक परिणामासंदर्भात व्यष्टी अर्थशास्त्र (मायक्रोइकॉनॉमिक्स) आणि संसाधनांचे पुनर्वाटप, महामारीवर नियंत्रण आणि मंदीचा परिणाम शमविण्यासंदर्भात समाष्टी अर्थशास्त्र (मॅक्रोइकॉनॉमिक्स) क) सोशलायझेशन आणि सोशल डिस्टन्सिंगसंदर्भात सामाजिक आणि वर्तनात्मक शास्त्र ड) वैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय आवश्यक वस्तूंचा पुरवठा आणि दळणवळणाचे (लॉजिस्टिक्स) व्यवस्थापन ई) महामारीच्या परिस्थितीचा योग्य अंदाज लावण्यासाठी आणि संसाधनांच्या नियोजनासाठी आकडेवारी फ) प्रशासन, कायदा आणि सुव्यवस्था ग) रोगाच्या आर्थिक परिणामांचा सामना करण्यासाठी विद्यमान आणि उदयोन्मुख संसाधनांचे समान पुनर्वितरण होत आहे याची खात्री करण्यासाठी अर्थसहाय्य
विसाव्या शतकात लसी आणि अँटीबायोटिक्सने जी भूमिका बजावली, एकविसाव्या शतकात तीच भूमिका सार्वजनिक आरोग्य निभावणार आहे. कोरोना विषाणूने भविष्यातील कृतींसाठी हा आधार दर्शविला आहे.
- मयुर त्रिवेदी (सहयोगी प्राध्यापक, आयआयपीएच- गांधीनगर) (लेखात व्यक्त करण्यात आलेली मते वैयक्तिक आहेत.)