मंगळुरू - एका स्थानिक न्यायालयाने, कुख्यात सीरियल किलर 'सायनाईड' मोहनला एका तरुणीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले आहे. केरळमधील कासारगोडा येथे एका तरुणीवर अत्याचार करुन, तिला सायनाईड पाजून मोहनने तिची हत्या केली होती. याप्रकरणी २४ जूनला शिक्षा सुनावण्यात येण्याची शक्यता आहे.
मोहनविरोधात दाखल असलेला हा २०वा खुनाचा गुन्हा आहे. कित्येक तरुणींना आणि महिलांना मैत्रीच्या जाळ्यात अडकवून, त्याने त्यांच्यावर अत्याचार केले होते. त्यानंतर सायनाईड पाजून तो त्यांची हत्या करत असे. त्यामुळेच त्याला 'सायनाईड मोहन' असे नाव मिळाले होते.
या प्रकरणातील तरुणी कासारगोडमधील एका महिला वसतीगृहात ती आचारी म्हणून काम करत होती. २००९ला तिची मोहनशी ओळख झाली. त्यानंतर आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तिला अडकवून मोहनने तिला लग्नाचे वचनही दिले होते. ८ जुलै २००९ला ती मंदिरात जाते सांगून आपल्या घरातून पळून गेली. त्यानंतर मोहन तिला कर्नाटकमधील बंगळुरूला घेऊन गेला. तिच्या घरच्यांनी चौकशीसाठी फोन केला असता, तिने आपण लग्न केल्याचे सांगितले, तसेच आपण लवकरच घरी येऊ असेही सांगितले.