बंगळुरू - 'एआयएडीएमके'मधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्या शशीकला यांची अखेर चार वर्षांनंतर तरुंगातून सुटका झाली आहे. भष्ट्राचाराच्या प्रकरणात शशिकला यांनी न्यायालयानं ठोठावलेली शिक्षा पूर्ण केलीय. गेल्या चार वर्षांपासून बंगळुरूच्या परप्पना अग्रहरा तुरुंगात त्या शिक्षा भोगत होत्या.
शशीकला यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना बंगळुरूच्या बोरिंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आलं. 20 जानेवारी रोजी शशिकला कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्यामुळे त्यांना अतिदक्षताविभागातून सामान्य विभागात हलवण्यात आले आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या एकेकाळच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवास देण्यात आला होता. शशिकला यांची आज शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात येत आहे. सुटकेची सगळी प्रक्रिया रुग्णालयातच पार पडली.
काय आहे प्रकरण..
66 कोटी रुपयांच्या मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना 2017 च्या फेब्रुवारीमध्ये चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर, सात ऑक्टोबर 2020 ला प्राप्तिकर विभागाने शशिकला यांची तब्बल 2 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. यापूर्वी प्राप्तिकर विभागाने 2017 मध्ये शशिकला व त्यांच्या जवळील व्यक्ती, कुटुंब यांच्याशी संबंधित असलेल्या 150 ठिकाणी छापे मारले होते.