देशात जेवढे राज्यपाल आहेत, सरकारचे 'चमचे' आहेत - संजय निरुपम
'आपल्या देशाचे जेवढे राज्यपाल असतात, ते सगळे सरकारचे 'चमचे' असतात. सत्यपाल मलिकही असा 'चमचा' आहे,' अशी बोचरी टीका संजय निरुपम यांनी केली. मलिक यांनी 'राजीव गांधी स्वतः भ्रष्ट नव्हते. मात्र, काही लोकांच्या नादाने ते बोफोर्स घोटाळ्यात सहभागी झाले,' असे म्हटले होते.
नवी दिल्ली - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप थांबलेले नाहीत. अनेक नेते या वादात उडी घेत आहेत. नुकतेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर चमचेगिरीचा आरोप केला आहे.
'आपल्या देशाचे जेवढे राज्यपाल असतात, ते सगळे सरकारचे 'चमचे' असतात. सत्यपाल मलिकही असा 'चमचा' आहे. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणामध्ये न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे. अरुण जेटली यांनीही राजीव यांना क्लीन चिट दिली होती. मात्र, असे वाटते आहे की, मलिक मोदींची 'चापलूसी' करत आहेत,' अशी बोचरी टीका संजय निरुपम यांनी त्यांच्यावर केली.
राज्यपाल मलिक यांनी 'राजीव गांधी स्वतः भ्रष्ट नव्हते. मात्र, काही लोकांच्या नादाने ते बोफोर्स घोटाळ्यात सहभागी झाले,' असे म्हटले होते.
'पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींवर ते पहिल्या क्रमांकाचे भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केला होता, तेव्हा त्यांचे तोंड बंद होईल, एवढी टीका त्यांच्यावर झाली होती. मात्र, सत्यपाल मलिक यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते खुर्ची वाचवण्यासाठी मोदींची चमचेगिरी करत आहेत, असे दिसते. राज्यपालांनी स्वतःची आणि पदाची इभ्रत राखली पाहिजे,' असे ते म्हणाले.