नवी दिल्ली- जेएनयू विद्यार्थी मारहाण प्रकरणी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर विरोध प्रदर्शन करण्यात आले होते. या प्रदर्शनात काही विद्यार्थ्यांनी 'फ्री काश्मीर' चे पोस्टर्स झळकवले होते. यावर शिवसेनेने नरम भूमिका घेतली. मात्र, या प्रकरणी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारेवर धरले आहे. संबित पात्रा यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना 'सोनिया सैनिक' असे संबोधिले आहे.
माझ्यावर विश्वास ठेवा, हे सोनिया सैनिक तुकडे-तुकडे गटाला आपले समर्थन दाखविण्याच्या नादात पुढे तुम्हाला प्रभू रामांविषयी अपशब्द बोलताना दिसतील. आणि हिंदू दहशतवादाची वेगळीच व्याख्या घऊन पुढे येतील, असा आरोप संबित पात्रा यांनी ट्विटरवर केला आहे. दरम्यान, अलीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत विरोध प्रदर्शनातील काश्मीर मुक्तीचे बॅनर हे राज्यातील इंटरनेट आणि मोबाईल सुविधांवर असलेल्या प्रतिबंधातून स्वतंत्रता मिळावी याबाबत असल्याचे सांगितले होते. मात्र, काश्मीरला मुक्त करणे ही शिवसेनेची भूमिका नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. विरोध प्रदर्शनावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे. मुंबईतील विरोध प्रदर्शनाचा आधार काय ? फ्री काश्मीरच्या घोषणा कशासाठी ? आणि फुटीरतावाद्यांना मुंबई कशी काय खपवून घेऊ शकते ? उद्धवजी तुमच्या नाकाखाली हा प्रकार घडला आहे, असे ट्विट करत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.