जयपूर - राजस्थानमध्ये काँग्रेसच्या सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार असताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी महत्त्वपू्र्ण विधान केले आहे. बंडखोर आमदारांनी भाजपचे आदरातिथ्य आणि हरियाणा पोलिसांची सुरक्षा सोडावी, असे सुरजेवाला यांनी आवाहन केले. त्यानंतरच पक्षाशी चर्चा करावी, असे सुरजेवाला यांनी सांगितले.
राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारला आमदारांचे बलाबल राखण्यासाठी काळजी घ्यावी लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर रणदीप सुरजेवालासह काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते हे जैसलमेरमध्ये तळ ठोकून आहेत. काँग्रेसने जैसलमेरमधील ह़ॉटेल सूर्यागढमध्ये आमदारांना सुरक्षित ठेवले आहे. या हॉटेलबाहेर सुरजेवाला यांनी माध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना पक्षाची दारे खुली असल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र, त्यांनी काही अटींवर पक्षाशी संवाद साधायला हवा. बंडखोर आमदारांनी हरियाणा पोलिसांची सुरक्षा, भाजपची मैत्री व आदरातिथ्य सोडावे, अशी सुरजेवाला यांनी अट असल्याचे सांगितले.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या प्रकरणात बिहार पोलिसांनी हस्तक्षेप केला आहे. मात्र, न्यायालयीन कार्यक्षेत्र हे महाराष्ट्र पोलिसांचे असल्याने बिहार पोलिसांकडून होणारा तपास अयोग्य असल्याची प्रतिक्रिया सुरजेवाला यांनी दिली. बिहार पोलीस मुंबई पोलिसांच्या न्यायालयीन कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाहीत. अशा परिस्थितीमुळे अनागोंदी होवू शकते. अशा परिस्थितीत कायद्याची अंमलबजावणी करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.