नवी दिल्ली- एके काळी देशभरात प्रसिद्ध असणारी रामायण ही मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली.
कोरोनामुळे आता पुन्हा होणार 'रामायण'!
रामानंद सागर निर्मित रामायण मालिका देशभरात प्रसिद्ध होती. या मालिकेचे प्रसारण जेव्हा व्हायचे तेव्हा रस्त्यांवर शुकशुकाट असायचा, दुकाने बंद असायची आणि देशभरात जणू कर्फ्यूच लागला आहे असे वातावरण असायचे.
रामानंद सागर निर्मित रामायण मालिका देशभरात प्रसिद्ध होती. या मालिकेबद्दल असे सांगितले जाते, की रविवारी रामायण लागणार म्हणून लोक आपापल्या घरीच थांबायचे. त्यामुळे या मालिकेचे प्रसारण जेव्हा व्हायचे तेव्हा रस्त्यांवर शुकशुकाट असायचा, दुकाने बंद असायची आणि देशभरात जणू कर्फ्यूच लागला आहे असे वातावरण असायचे.
आता कोरोनामुळे देशाला खरोखरच लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना पुढील २१ दिवस आपल्या घरातच बसून काढायचे आहेत. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनेही लोकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. यानुसार डीडी नॅशनल, म्हणजेच दूरदर्शनवर ही मालिका दाखवण्यात येणार आहे. उद्या (शनिवार) पासून याचे दररोज दोन भाग दाखवण्यात येतील. सकाळी नऊ ते दहा, आणि रात्री नऊ ते दहा या वेळेमध्ये हे दोन भाग दाखवण्यात येणार आहेत, असेही जावडेकरांनी स्पष्ट केले.