नवी दिल्ली- भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असाताना नव्याने जाहीर झालेली आकडेवारी सर्वांनाच धक्का देणारी आहे. दुसऱ्या तिमाहीतील जीडीपी म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्न ४.५ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तसेच ८ कोटी उद्योगांचे उत्पादन ५.८ टक्क्यांनी खाली घसरले आहे. या आकडेवारीवरुन भारतीय अर्थव्यवस्था आणखीन खोलात चालल्याचे दिसून येत आहे.
उत्पादन आणि निर्यात क्षेत्रही मंदीचा सामना करत आहे. २०१३ साली सर्वात कमी ४.३ ट्क्के जीडीपी नोंदवला गेला होता. त्यानंतर आता सर्वात कमी आकडेवारी चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत नोंदवण्यात आली आहे. दुसऱ्या तिमाहीत साधारण विकास दरही( नॉमिनल ग्रोथ रेट) ६. १ टक्क्यावर येऊन स्थिरावला आहे. २०१९- २० या चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत जीडीपी ५ टक्क्यापर्यंत खाली आला होता. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीत जीडीपी ५.८ टकक्यावर होता. २०१८-१९ सालातील तिसऱ्या तिमाहीत ६.६ टक्के जीडीपी होता. यावरुन भारतीय अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचे दिसून येत आहे.
वस्तू आणि सेवा कर जास्त असल्यामुळे बाजारातील मागणी रोडावली आहे. तसेच कृषी क्षेत्रात मरगळ आली आहे. कामगारांची पगारवाढ थांबली असून अनेक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आहेत. घरगुती बाजारातील वस्तूचा उपभोग कमी झाल्याने अर्थव्यवस्थेत मंदी आल्याचे बोलले जात आहे. बँका, उत्पादन, एफएमसीजी, वाहन क्षेत्र, ग्राहक उपयोगी वस्तू आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये मंदी आली आहे.उत्पादन, इलेक्ट्रीसिटी, खानकाम या क्षेत्रात काम करणाऱ्यांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. रिजर्व बँक ऑफ इंडियांने २०१९-२० साली जीडीपी ६.१ टक्क्यावर राहणार असल्याचे भाकित केले होते. त्याआधी विकास दर ६.९ टक्के राहणार असल्याचे सर्वोच्च बँकेने म्हटले होते. मात्र, नंतर आकडेवारीत बदल केला होता. आता विकास दर ४.५ टक्क्यांवर आल्याने सर्वांना धक्का बसला आहे.