नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी एका गावात सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय मुलीचा मंगळवारी सकाळी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते.
तिच्या मृत्यूची बातमी पसरताच दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालय परिसर तसेच, हाथरस येथील विजय चौकात नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांनी तिला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या निषेधाचे नेतृत्व भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केले. त्यांनी दलित समाजातील सर्व सदस्यांसह रस्त्यावर उतरत दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
'आमच्या बहिणीच्या मृत्यूला राज्य सरकारही तितकेच जबाबदार आहे. आम्ही दोषींना फाशीच्या शिक्षेची मागणी करतो. सरकारने आमच्या धैर्याची परीक्षा घेऊ नये. दोषींना फाशी होईपर्यंत आम्ही विश्रांती घेणार नाही,' असे आझाद म्हणाले. आझाद यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश सरकारने त्या तरुणीला चांगल्या उपचारासाठी एम्समध्ये हलविण्याची मागणी केली होती.