प्रियांका, सचिन पायलट, सुरजेवाला राहुल गांधींच्या निवासस्थानी; राजीनामा मागे घेण्याची शक्यता
राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, राहुल यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला होता. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतरही तो कार्यसमितीकडून स्वीकारण्यात आला नव्हता. तरीही राजीनामा नाट्य सुरूच होते.
नवी दिल्ली - प्रियांका गांधी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला आणि पक्षाचे प्रभारी महासचिव के. सी. वेणुगोपाल आज राहुल गांधींच्या निवासस्थानी पोहोचले. राहुल गांधींनी पक्षाच्या कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. याविषयी राहुल यांच्याशी बातचित करण्यासाठी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी राहुल यांची भेट घेतली.
राहुल यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, राहुल यांनी राजीनामा मागे घेण्यास नकार दिला होता. राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतरही तो कार्यसमितीकडून स्वीकारण्यात आला नव्हता. तरीही राजीनामा नाट्य सुरूच होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसला नवा नेता मिळवून देणे तितके सोपे नाही. तसेच, राहुल या पदावर कायम राहिल्यास पक्षाची पुनर्बांधणी आणि नियोजन करणे शक्य होईल. तसेच, पराजयाची जबाबदारी संपूर्ण पक्षाची आहे. ती कोणा एकट्या व्यक्तीची जबाबदारी नाही, हे राहुल गांधींना पटवून देण्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले आहे. यामुळे राहुल राजीनामा मागे घेण्याच्या शक्यतांमध्ये वाढ झाली आहे.
एका कार्यसमिती सदस्याने पराजयाच्या कारणांची प्रामाणिक चिकित्सा होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. तर, काँग्रेसने हे निव्वळ तर्क-वितर्क आणि अफवा असल्याचे म्हटले आहे.
'प्रसारमाध्यमांमधील प्रत्येकाने काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीत बंद दरवाज्यामागे झालेल्या चर्चा आणि विषयांच्या गोपनीयतेचा आदर करावा, अशी काँग्रेस पक्षाची अपेक्षा आहे. विविध तर्क-वितर्क, गृहीतके, चर्चा, अफवा यांचे प्रसारमाध्यमांच्या एका भागातून पेव फुटत आहे. त्यांची काहीही आवश्यकता नाही,' असे सुरजेवाला यांनी ट्विट केले आहे.