नवी दिल्ली- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अजूनही कोमातच आहेत. परंतु, त्यांची तब्येत स्थिर आहे. त्यांना अजूनही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने शनिवारी मेडिकल बुलेटीनद्वारे दिली.
प्रणव मुखर्जी यांची 10 ऑगस्टला मेंदुची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदूजवळ गाठ आल्याने डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला होता. तसेच मुखर्जी यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले होते..
प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होत. त्यांनी 2012 त 2017 दरम्यान राष्ट्रपती पद भूषविले होते.
वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे मुलाचे आवाहन
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत मुखर्जी यांनी बुधवारी 19 तारखेला दिली होती. अभिजीत यांनी वडिलांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, रुग्णालय प्रशासनाने मुखर्जी अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याचे सांगितले. अभिजीत मुखर्जी यांच्या ट्वीटला त्यांनी दुजोरा न देता प्रकृतीत मोठी सुधारणा नसल्याचे सांगितले आहे. त्यांना फुप्फुसात संसर्ग असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.