कोलकाता - कोरोनाबाधित रुग्णसंख्या जास्त असलेल्या संवेदनशील परिसरातील नागरिकांकडून पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीसच नाही तर आरोग्य कर्मचाऱ्यांवरही हल्ले होत आहेत. अशातच पश्चिम बंगाल राज्यातील हावडा जिल्ह्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी करत असताना जमावाने पोलिसांवर हल्ला केला. हा परिसर 'रेड झोन' म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आज (मंगळवारी) दुपारी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये 'रेड झोन' परिसरात जमावाचा पोलिसांवर हल्ला
जिल्ह्यातील तिकापार परिसरातील बाजारात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्त पथक तेथे गेले होते.
जिल्ह्यातील तिकापार परिसरातील बाजारात मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गस्त पथक तेथे गेले होते. बाजारात सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन केले. त्यामुळे चिडलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली, तसेच त्यांना मारहाण केली. दोन पोलीस गाड्यांची जमावाने तोडफोड केली, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अतिरिक्त कुमक मागविण्यात आली होती. त्यानुसार आरएएफ जवानांचा ताफा आणि पोलीस पथक घटनास्थळी आले. हावडा जिल्ह्याचे तृणमूल काँग्रेसचे नेते आणि वनमंत्री राजीब बॅनर्जी यांनी या हल्ल्याची निंदा केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले.