नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी चौथ्या लॉकडाऊनचा उल्लेख केल्यामुळे, देशात चौथे लॉकडाऊन लागू होण्याचे संकेत दिसून येत आहेत. यासोबतच पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पुन्हा १५ मेला बैठकीसाठी निमंत्रित केले आहे.
आज झालेल्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, की आपल्याकडे आता देशातील कोरोना प्रसाराची संपूर्ण भौगोलिक माहिती आहे. कोणत्या भागामध्ये या विषाणूचा सर्वाधिक आणि सर्वात कमी प्रसार झाला आहे, याची माहिती आता आपल्याकडे आहे. तसेच, यावर कसे नियंत्रण ठेवायचे हे अगदी जिल्हापातळीवरील अधिकाऱ्यांनाही माहिती झाले आहे. हीच माहिती आपल्याला कोरोनाशी लढण्यास उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळेच आता यापुढील पावले आपण वेगाने उचलू शकणार आहोत.
आपल्यासमोर दोन मुख्य आव्हाने आहेत, ती म्हणजे विषाणूचा प्रसार कमी करणे, आणि त्यासोबतच टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत करणे. या दोन्ही बाबींकडे आपल्याला काटेकोरपणे लक्ष द्यायचे आहे. त्यासाठी आपल्याला काही नियम, निर्बंध पाळावे लागणार आहेत. अर्थात, पहिल्या लॉकडाऊनमध्ये लागलेले निर्बंध दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये जसेच्या तसे घेणे आवश्यक नव्हते. तसेच, दुसऱ्या लॉकडाऊनमधील सर्व निर्बंधांची आवश्यकता तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये नव्हती. त्याचप्रमाणे चौथ्या लॉकडाऊनमध्येही तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये असलेल्या निर्बंधांपैकी काही निर्बंध काढून टाकता येऊ शकतात. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, की आपल्याला आता ग्रामीण भागामध्ये होणारा कोरोनाचा प्रसार कसा रोखता आणि टाळता येईल याकडे लक्ष द्यायला हवे. राज्य सरकारांनी राज्यांची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी जे उपाय सुचवले आहेत, त्यांवर विचार सुरू आहे. मी तुम्हा सगळ्यांना (मुख्यमंत्री) विनंती करतो, की १५ मेला तुम्ही आपापल्या राज्यांमधील लॉकडाऊनला कशा प्रकारे पुढे नेणार आहात, याची विस्तृत योजना घेऊन मला भेटाल. लॉकडाऊनदरम्यान, तसेच लॉकडाऊन शिथील केल्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती तुम्ही कशा प्रकारे हाताळणार आहात, याची योजना तुम्ही मला सादर कराल, असे पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.