वॉशिंग्टन- पाकिस्तान सध्या आर्थिक अडचणींमध्ये पुरता अडकला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडे कर्जासाठी डोळे लावून बसला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गाजावाजा करत अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आहेत. मात्र, चीन बरोबर गट्टी जमली असताना अमेरिकेला भेट देणे म्हणजे, चीन बरोबर लग्नं आणि अमेरिकेसोबत लफडं, असल्याचे मत पाकिस्तातून हद्दपार केलेले पत्रकार तहा सिद्दिकी यांनी म्हटले आहे.
चीनसोबत बनवत असलेल्या 'सीपीईसी' म्हणजेच चायना पाकिस्तान ईकॉनॉमिक कॉरिडार' या प्रकल्पाची गती मंदावली आहे. यातून जास्त काही पदरात पडत नसल्याचे पाहून पाकिस्तानने आपला मोर्चा अमेरिकेकडे वळवला आहे. या भेटीतून पंतप्रधान इम्रान खान आर्थिक आणि लष्करी मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तान आशिया खंडामध्ये भू-राजकीयदृष्या महत्त्वाच्या असलेल्या स्थानाचा पुरेपूर फायदा उठवत असल्याचे, तहा सिद्दिकी यांनी म्हटले आहे.