नवी दिल्ली - मागील चार महिन्यांपासून लडाखमधील भारत-चीन सीमेवर तणाव सुरू आहे. गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीनंतर सीमेवर पुन्हा आता नव्याने तणाव निर्माण झाला आहे. चीनने भारतीय भूमीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कराने चिनीचा प्रयत्न उधळून लावला. त्यानंतर दोन्ही देशांचे सैन्य सतर्क झाले असून रणगाडेही फायरिंग रेंजमध्ये आहेत. दरम्यान, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांनी सीमेवरील संवेदशील परिस्थितीचा आढावा घेतल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
29 आणि 30 ऑगस्टला चीनकडून घुसखोरीचे प्रयत्न -
दोन्ही देशांमध्ये सीमावादा संबंधी लष्करी कमांडर स्तरावर चर्चा सुरू आहे. मात्र, चीनच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे चर्चेचे घोंगडे भिजत पडले आहे. सीमारेषेवरील वादावर अंतिम तोडगा निघाला नसतानाही 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पूर्व लडाखमधील पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या हालचाली अचानक वाढल्या होत्या. सीमेवरील परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न चिनी लष्कराने केला. मात्र, भारतीय सैन्याने त्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला. चीनने आता भारतानेच घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा -चीनच्या राजदूत कार्यालयाकडून भारतावरच पँगाँग त्सो घुसखोरी केल्याचा आरोप