गांधीनगर - आपल्या पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २४ फेब्रुवारीला गुजरातमध्ये दाखल होणार आहेत. यावेळी विमानतळापासून 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाच्या स्थळापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रोड-शो करणार आहेत. २२ किलोमीटर लांब अशा या रोड-शो ला साधारणपणे एक लाख लोक उपस्थित असतील, अशी माहिती मिळत आहे.
या दौऱ्याबाबत बोलताना ट्रम्प यांनी रोड-शो ला उपस्थित राहणाऱ्या लोकांची संख्या सात दशलक्ष (सत्तर लाख) असल्याचे म्हटले होते. मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार ही संख्या ट्रम्प यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी असल्याचे दिसून येत आहे.
"विमानतळापासून कार्यक्रमस्थाळापर्यंत माझ्या स्वागतासाठी सात दशलक्ष लोक असणार आहेत, असे मला पंतप्रधान मोदींनी सांगितले. हे सर्व फारच रोमांचकारी आहे. मला आशा आहे, की तुम्ही सर्व या कार्यक्रमाचा आनंद घ्याल." असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. तर, अहमदाबादचे महापालिका आयुक्त विजय नेहरा यांनी ट्विट करून सांगितले होते की, "#मारोअमदाबाद म्हणतेय #नमस्ते ट्रम्प. #इंडियारोडशो अधिकाधिक विराट होत आहे. एक लाखांहून अधिक लोकांनी २२ किलोमीटरच्या या रोड शोसाठी अगोदरच आपला सहभाग नक्की असल्याचे कळवले आहे."
ट्रम्प यांच्या अहमदाबादमधील भेटीसाठी तीन तासांची वेळ निर्धारित केली असून, यात साबरमती आश्रमाला धावती भेट आणि दुपारच्या भोजनाचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले. यावेळी हे दोनही नेते समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांशी संवाद साधतील आणि मोटेरा येथील नागरिकांचा भरगच्च सहभाग असलेल्या नव्या क्रिकेट स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम दुपारनंतर अर्ध्या तासाने होईल. गेल्या वर्षी ह्यूस्टन येथे झालेल्या 'हाऊडी मोदी' या अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या कार्यक्रमापेक्षा हा कार्यक्रम कितीतरी मोठा होण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा :नमस्ते ट्रम्प : भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि उर्जा प्रमुख मुद्दे, छोट्या व्यापारी कराराची शक्यता नाही!