निर्भया फंड: देशभरातील पोलीस ठाण्यात महिला मदत केंद्र स्थापन करण्यासाठी १०० कोटी
देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्र स्थापन करण्यासाठी निर्भया निधीतून १०० कोटी रुपये देण्यास मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली- महिलांविरोधात दिवसेंदिवस लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशा घटनांना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. देशभरातील पोलीस ठाण्यांमध्ये महिला मदत केंद्र स्थापन करण्यासाठी निर्भया निधीतून १०० कोटी रुपये देण्यास मंजूरी दिली आहे.
महिला मदत केंद्र महिलांना मदत करण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असेल. तसेच पीडिता मदत केंद्रामध्ये येऊनही तक्रार दाखल करू शकते. तसेच मदत केंद्राद्वारे पीडित महिलेला मानसिक आणि भावनिक सहकार्यही करण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात या केंद्राची स्थापना करण्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.
प्रत्येक राज्य सरकार मदत केंद्रात महिला पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करेल. तसेच हा प्रकल्प प्रभाविपणे लागू करेल. मदत केंद्रामध्ये काम करणाऱ्या पोलिसांना संवेदनशीलपणे महिलांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रशिक्षण दिले जाईल. पीडित महिलांना कायदेशीर सहाय्य, मानसिक आधार, पुनर्वसन, प्रशिक्षण यासारखी मदतही केली जाईल. या महिला मदत केंद्रांवर मानशास्त्रज्ञ, स्वयंसेवी संस्थांच्या व्यक्तींनाही सहभागी करून घेतले जाणार आहे.