नवी दिल्ली - चांद्रयान-२ आज मध्यरात्रीनंतर चंद्रावर उतरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी देशवासीय, तसेच जगभरातील वैज्ञानिक उत्सुक आहेत. दिल्लीमधील नेहरू तारांगणामध्ये देखील यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये तारांगणातील 'मून कार्निवल'च्या व्यवस्थापक प्रेरणा यांनी याबाबत माहिती दिली. चांद्रयान-२ च्या प्रक्षेपणानंतरच नेहरू तारांगणात मून कार्निवल सुरु झाले होते.
Chandrayaan-2 : 'चांद्रयान-२'चे लँडिंग पाहण्यासाठी नेहरू तारांगण सज्ज! लोकांना चांद्रयानाचे लँडिंग पाहता यावे यासाठी आम्ही 'पब्लिक स्कायवॉच'चे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याची भरपूर लोकांची इच्छा आहे. त्यामुळे, तारांगणात आज मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. अशी माहिती प्रेरणा यांनी दिली.
तारांगणाच्या आवारात बसवलेल्या दुर्बिणींमधून लोकांना ताऱ्यांचे दर्शन घेता येईल. यासोबतच, तारांगणाच्या स्काय थिएटरमध्ये 'बॅक टू मून' हा इन-हाऊस कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानंतर तारांगणाच्या संचालिका रतनश्री यांच्यासह संवाद देखील आयोजित केला गेला आहे. मध्यरात्रीनंतर, दीड वाजल्यापासून चांद्रयानाच्या लँडिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-२ काही तासांमध्ये शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीड ते अडीचच्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. या यशस्वी लँडिंगनंतर रशिया, अमेरिका आणि चीन या देशांनंतर चंद्रावर स्वतःचे यान उतरवणारा भारत चौथा देश ठरणार आहे. चांद्रयान-२ ची लॅडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील सुमारे ६०-७० विद्यार्थी बंगळुरुमधील इस्रो सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : आजवर जिथे कोणीच पोहोचले नाही, तिथे आपण उतरणार - के. सिवान