नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच प्रख्यात हॉलीवूड सेलिब्रीटी बेअर ग्रिल्सच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड कार्यक्रमाच्या 'स्पेशल शो' मध्ये दिसणार आहेत. संबंधित कार्यक्रमाचा टिजर बेअर ग्रील्सने त्याच्या ट्वीटरवर शे्अर केला असून, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असणाऱ्या देशाच्या पंतप्रधानासोबत लवकरच येत असल्याची माहिती दिली आहे. वन्यजीव व पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता पसरवण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे पंतप्रधानांकडून सांगण्यात येत आहे. उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय अभयरण्यात डिस्कव्हरी चॅनेलने या शो चे शूटिंग पूर्ण केले आहे.
या टिजरमध्ये, तुम्ही देशातील सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात; त्यामुळे तुमच्या जीवाचं रक्षण कारणं माझी जबाबदारी असल्याचे बेअर ग्रील्स बोलत आहे. १२ ऑगस्टला हा कार्यक्रम डिस्कव्हरी चॅनेलवर प्रदर्शित होणार आहे.
बेअर ग्रील्स हा अमेरिकेच्या स्पेशल एअर सर्विसेसच्या बचावपथकात कार्यरत होता. यानंतर त्याला मानद लेफ्टनन्ट कर्नल पदवी बहाल करण्यात आली. अज्ञात ठिकाणी अडकल्यास स्वत:ची सुटका कशी करून घ्यावी यासंबंधी डिस्कव्हरी वाहिनीच्या मॅन व्हर्सेस वाईल्ड नामक कार्यक्रमातून त्याने प्रेक्षकांची पसंती मिळवली. जगाच्या पाठिवरील वाळवंटे, बर्फाच्छादित प्रदेश तसेच घनदाट जंगलांमध्ये जाऊन त्याने बचावात्मक प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून लोकांची वाहवा मिळवली. अनेकवेळा रोमांचकारी प्रसंग, भयभीत करणाऱ्या रात्री, वन्यजीवांचा सहवास यांमधून वाट काढत बेअर ग्रील्स परिस्थीतींना तोंड देतो. डिस्कवरी चॅनेलवर प्रदर्शित होणाऱ्या या कार्यक्रमात दूरदूर पर्यंत मानवी वस्ती नसणाऱ्या प्रांतांमध्ये शारीरिक ऊर्जेसाठी सापांसून ते कीटक, विंचू, वनस्पती, प्राण्यांचे डोळे अशा अघोरी पण उपयुक्त गोष्टींचा खाण्यासाठी वापर करताना आपण बेअर ग्रील्सला पाहिले आहे.
काहीकाळानंतर त्याने हॉलीवूडच्या सिने-तारकांसोबत अशा आशयाचे कार्यक्रम सुरु केले. जागतिक कीर्तीच्या अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात उपस्थिती लावून जंगलातील रोमाचकारी घटनांचा अनुभव घेतला आहे.
यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा यांनीही कार्यक्रमात उपस्थितही लावली होती. अलास्काच्या गोठवणाऱ्या थंडीत ओबामा यांचा मासा खाताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पंतप्रधान मोदींना अशा सर्व्हायवरच्या भूमिकेत पाहाण्यास लोकांमध्ये उत्सुकता आहे.