नवी दिल्ली- केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मंगळवारी पाच वेगवेगळ्या राज्यांमधील सहा शहरांना कचरा व्यवस्थापन आणि नियोजनासाठी ५-स्टार रेटिंग दिले. कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंगच्या निकालांची घोषणा करताना एमएचयूएचे मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले, की अंबिकापूर (छत्तीसगड), राजकोट (गुजरात), सूरत (गुजरात), म्हैसूर (कर्नाटक), इंदूर (मध्य प्रदेश) आणि नवी मुंबई (महाराष्ट्र) या शहरांना ५-स्टार रेटिंगसह प्रमाणित केले गेले आहे.
पाच वर्षांपूर्वी आम्ही स्वच्छ सर्व्हेक्षण ही योजना जाहीर केली. ही योजना म्हणजे, शहरी भारताचे वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण. या मोहिमेच्या माध्यमातून शहरी भागातील स्वच्छतेच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे, असे पुरी यांनी सांगितले. यावेळीच त्यांनी हेही स्पष्ट केले, की ही रँकिग सिस्टीम असल्यामुळे, चांगले काम करूनही अनेक शहरांचा या यादीमध्ये समावेश होऊ शकला नाही. त्यामुळेच आम्ही यावेळी कचरामुक्त शहरांसाठी स्टार पद्धतीने रँकिंग देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ज्याप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना गुण मिळतात, त्याचप्रमाणे एका शहराला तेथील कचरा व्यवस्थापन पाहून मार्क दिले गेले. यामध्ये नाल्यांची स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्याचे नियोजन, बांधकाम कचऱ्याचे नियोजन इत्यादी बाबी लक्षात घेतल्या गेल्या.