नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी व जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा झाली. यामध्ये जर्मनी आणि भारतादरम्यान विविध क्षेत्रातील सहकार्यासाठी तब्बल 5 संयुक्त घोषणापत्रासह 11 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
दोन्ही देशांनी नवीन आणि प्रगत तंत्रज्ञानामध्ये धोरणात्मक सहकार्यावर आणि कौशल्य, शिक्षण, सायबर सुरक्षा सहकार्यावर भर दिला आहे. नागरी उड्डाण, औषध आणि शिक्षण यासारख्या क्षेत्रात एकूण 11 सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामुळे दोन्ही देशांच्या धोरणात्मक उद्देशांना बळकटी निर्माण होण्याचा मार्ग सुकर होईल अशी आशा मोदी आणि मर्केल यांनी व्यक्त केली.
दोन्ही नेत्यांनी दहशतवादाविरूद्धच्या लढाईत एकमेकांना पाठिंबा देण्याविषयी चर्चा केली. दोन्ही देशांची मैत्री अतूट आहे. हवामान बदलाच्या मुद्द्यांवर भारत आणि जर्मनीचे एकमत असून यावर आम्ही सोबत पावले उचलणार आहोत, असे मर्केल म्हणाल्या.
2022 पर्यंत स्वतंत्र भारताला 75 वर्ष पुर्ण होतील. तोपर्यंत आम्ही न्यू इंडिया निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या प्रयत्नामध्ये भारताला तांत्रिक आणि आर्थिकदुष्ट्या मजबूत असलेल्या जर्मनीची मदत होईल. नवीन आणि प्रगत तंत्रज्ञान, कौशल्य, शिक्षण, सायबर सुरक्षा यासारख्या क्षेत्रात प्रगती करण्यावर आम्ही भर दिला आहे. याचबरोबर स्मार्ट सिटी, किनारपट्टी व्यवस्थापन, नदी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणामध्ये प्रगती करण्याचा निर्णय घेतल्याचे मोदींनी सांगितले.