राहुल गांधींकडून अडवाणींचा पुन्हा अपमान; म्हणाले - 'मोदींनी लाथ मारून हाकलले'
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनीही काँग्रेस हताश झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्याकडून निवडणुकीचा स्तर खालच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल यांना कदाचित सभ्यता येतही नाही.
नवी दिल्ली/हरिद्वार - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे केलेल्या भाषणात पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि संस्थापक लाल कृष्ण अडवाणी यांच्यावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. मात्र, असे करताना त्यांनी अडवाणी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे त्यांनी म्हटले आहे. तसेच, गुरुचा अपमान करणे ही भारतीय संस्कृती नव्हे, असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केलेल्या भाषणात राहुल यांनी दुसऱ्यांदा अपमानास्पद भाषा वापरली आहे. 'नरेंद्र मोदी हिंदू धर्माबद्दल सांगतात. हिंदू धर्मात गुरु सर्वांत मोठा आणि आवश्यक असतो. अडवाणी नरेंद्र मोदींचे गुरु आहेत. अडवाणींची परिस्थिती पाहिली तुम्ही? मोदींनी अडवाणींना लाथ मारून स्टेजवरून खाली उतरवले,' असे ते म्हणाले. 'याआधी अडवाणींना बुटाने मारून बाहेर काढण्यात आले,' असे त्यांनी म्हटले होते.
राहुलजी, मर्यादेत रहा...
राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपतील अनेक नेत्यांनी आक्षेप दर्शवला होता. तसेच, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी राहुल गांधींना मर्यादेत रहायला सांगितले होते. 'अडवाणी आम्हाला वडिलांसारखे आहेत. तुमच्या त्यांच्याबद्दल अपमानास्पद बोलण्याने आम्हा सर्वांना वेदना दिल्या आहेत. कृपया तुम्ही तुमच्या बोलण्यात मर्यादा राखा,' असे ट्विट स्वराज यांनी केले होते.