नवी दिल्ली - भारताने २७ मार्चला ‘मिशन शक्ती’द्वारे अवकाशातील उपग्रह पाडण्याची यशस्वी कामगिरी केली. हे मिशन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मागील दोन वर्षापासून १५० वैज्ञानिक मेहनत घेतली होती. तसेच, मिशन शक्तीमुळे अंतराळ स्थानकाला धोका नसून येत्या ४५ दिवसात हा कचरा (डेब्रिस) नष्ट होणार असल्याची माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे(डीआरडीओ) प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी दिला आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने 'मिशन शक्ती'वर टीका केली होती आणि या चाचणीमुळे अवकाशात सुमारे ४०० तुकडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला (आयएसएस) धोका निर्माण झाल्याचे सांगितले होते. मात्र, ईटीव्ही भारतशी बोलताना डीआरडीओ प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी कोणताही हानी होणार नाही, याची पुर्ण काळजी घेतल्याचे स्पष्ट केले. या चाचणीनंतर निर्माण झालेला कचऱ्यांने धोका होऊ नये, म्हणून उपग्रह पाडण्यासाठी ३०० किलोमीटरची कक्षा निवडण्यात आली होती. हा कचरा हळुहळु खाली येत असून संशोधकांच्या अंदाजानुसार येत्या ४५ दिवसात हा कचरा नष्ट होईल, अशी माहिती रेड्डी यांनी दिली.
भारताच्या मिशन शक्तीमुळे आयएसएसला धोका निर्माण झाला आहे. उपग्रह पाडण्याच्या अशा प्रकारची घटना भविष्यातील मानवी अवकाश मोहिमांसाठी अनुकूल नाही, असे विधान नासाचे जिम ब्रिडेन्स्टीन यांनी केले होते. मात्र, अमेरिकेचे संरक्षण विभाग पेंटागनने भारताच्या चाचणीमुळे कोणताही धोका नसल्याचे सांगितले आहे.