नवी दिल्ली - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला यांना भारतात राहण्याचा अधिकार नसल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले आहे. कलम 370 पुन्हा लागू करा, अशी मागणी मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्ला यांनी केली होती.
प्रल्हाद जोशी म्हणाले की, या दोघांनाही भारतात राहण्याचा अधिकार नाही. त्यातील एक म्हणतो, चीनच्या मदतीने कलम 370 पुन्हा लागू करू. चीन भारतावर आक्रमण करू इच्छितो आणि हे चीनची मदत मागण्याची भाषा वापरतात. यावरून जागतिक पातळीवर वेगळा संदेश जाणार असल्याचे ते म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील नेते आक्रमक...
गेल्यावर्षी कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला प्राप्त असलेला विशेष दर्जाही नाहीसा झाला होता. मात्र हा दर्जा परत मिळावा, यासाठी काश्मीरमधील सहा मोठे पक्ष एकत्र आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींनी 'पिपल्स अलायन्स फॉर गुपकर डिकलेरेशेन' संघटनेची घोषणा केली आहे.