कर्नाटक- मोबाईलमध्ये सेल्फी काढण्यासाठी लोकं कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. कर्नाटकातील जागतिक वारसा स्थळ हंपी येथील ऐतिहासिक वास्तू स्थळी एका व्यक्तीने सेल्फी काढण्याच्या नादात दोन खांब जमीनदोस्त केले. याप्रकरणी पोलिसांनी बंगळुरु येथील नागराज(४५) या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
सेल्फी काढण्याच्या नादात हंपी जागतिक वारसा स्थळाची नासधूस, एकजण अटकेत
कर्नाटकातील जागतिक वारसा स्थळ हंपी येथील ऐतिहासिक वास्तूस्थळी एका व्यक्तीने सेल्फी काढण्याच्या नादात दोन खांब जमीनदोस्त केले.
हंपी शहर विजयनगर साम्राज्याची राजधानी होती. १४ व्या शतकात बांधलेल्या अनेक ऐतिहासिक वास्तू हंपी मध्ये आजही दिमाखात उभ्या आहेत. या वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळामध्येही करण्यात आला आहे. मात्र, काही समाजकंटक अतिउत्साहात या वास्तूंचे नुकसान करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीवर ऐतिहासिक वास्तूचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. या आधीही हंपी येथे समाजकंटकांनी उभे असलेले खांब पाडले होते. यावरुन ऐतिहासिक स्थळांची सुरक्षितता राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे.