महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बंगालमधील प्रकल्पांमध्ये अडथळा आणू नका, ममतांचा नवीन केंद्रीय मंत्र्यांना इशारा

केंद्र सरकार बंगालमध्ये राबवू इच्छीत असलेल्या प्रकल्पांना बंगाल सरकार अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला संसदीय उपाययोजना कराव्या लागतील, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री (महिला व बालकल्याण)  देबाश्री चौधरी यांनी दिला होता.

ममता बॅनर्जी

By

Published : Jun 1, 2019, 4:10 PM IST

नवी दिल्ली- बंगालमध्ये सुरू असलेल्या केंद्रीय प्रकल्पात नविन केंद्रीय मंत्र्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न करू नये, असा इशारा बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय राज्यमंत्री देबाश्री चौधरी यांना दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि ममता यांच्यातील संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

बंगालच्या दोन मंत्र्यांची मोदींच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यामध्ये देबाश्री चौधरी आणि बाबुल सुप्रियो यांचा समावेश आहे. बंगाल सरकारसोबत सामंजस्याची भूमिका घेत आम्ही काम करू इच्छीतो. मात्र, केंद्र सरकार बंगालमध्ये राबवू इच्छीत असलेल्या प्रकल्पांना बंगाल सरकार अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला संसदीय उपाययोजना कराव्या लागतील, असे केंद्रीय राज्यमंत्री (महिला व बालकल्याण) देबाश्री चौधरी यांनी सांगितले. महिलांचे सशक्तीकरण हा भाजप सरकारचा प्रमुख अजेंडा आहे. त्यासाठी मागील एनडीए सरकारने काम केले आहे. येत्या काळातही महिलांचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू, असे त्या म्हणाल्या.

देबाश्री चौधरी यांनी ममतांना दिलेल्या या थेट इशाऱ्याला ममतांनी प्रत्युत्तर दिले आहे. माझ्या राज्यात केंद्र सरकारद्वारे राबवले जाणारे प्रकल्प नवीन मंत्र्यांनी रोखण्याचे प्रयत्न करू नये. संसदेतील बहुमतचा वापर करून केंद्र सरकार बंगालसोबत दुजाभाव करू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

गत काही दिवसांपासून ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारसोबत संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही भाजपने बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारली. मोदींच्या शपथविधी सोहळ्याकडेही ममतांनी पाठ फिरवली. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. शारदा चीट फंड घोटाळ्यावरूनही केंद्राने ममतांच्या अडचणीत भर घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे बंगाल सरकार विरूद्ध केंद्र असा संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details