पलवल- केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन कृषी कायद्यांना देशभरातील शेतकऱ्यांमधून विरोध होत आहे. या कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज या आंदोलनाचा १७ वा दिवस आहे. पलवलमध्ये मध्य प्रदेश आणि बुंदेलखंडचे शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनास्थळी पोहोचले होते.
यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'कृषी कायद्यांना संपूर्ण देशातून विरोध होत आहे. देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तरीदेखील केंद्र सरकार शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार नाही. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सरकार कमी लेखत आहे. त्यांना वाटत आहे की, हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी करत आहेत. खरं तर या आंदोलनात संपूर्ण देशभरातील शेतकरी सहभागी आहे.'
भाजपा सरकारच्या सत्तेत शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळत नाहीये. यामुळे अनेक शेतकरी आत्महत्येकडे वळत आहेत. केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कायद्याची काहीच गरज नाही. सरकारकडून हे कायदे शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लादले जात आहेत. जर सरकारला हे कायदे लागू करायचे होते, तर त्यांनी पहिले शेतकऱ्यांशी सल्लामसलत करायला हवे होते, असे देखील बच्चू कडू यांनी सांगितलं.