नवी दिल्ली - छत्तीसगड उच्च न्यायालयचे माजी चीफ जस्टिस (मुख्य न्यायमूर्ती) आणि लोकपालचे सध्याचे सदस्य न्या. अजय कुमार त्रिपाठी (वय 61 वर्षे) यांचा एम्स रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. न्यायमूर्ती ए.के. त्रिपाठी यांच्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून उपचार सुरु होते. त्यांना मागील 4 दिवसांपासून वेंटिलेटर लावण्यात आले होते. शनिवारी (दि. 2 मे) रात्री उशीरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगीही कोरोनाग्रस्त आहे. ती काही दिवसांपूर्वी लंडनहून परतली होती.
असा होता मुख्य न्यायमूर्ती होण्याचा प्रवास
त्रिपाठी हे छत्तीसगडच्या मुख्य न्यायमूर्ती पदी येण्यापूर्वी पटना उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम करत होते. त्रिपाठी हे मुळचे बोकारो (झारखंड)येथील रहिवासी होते. तेथे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली विद्यापीठात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1981 पासून पटना उच्च न्यायालयात त्यांनी सराव सुरु केला. ऑक्टोबर 2006 मध्ये ते पटना उच्चन्यायालयाचे न्यायधीश झाले आणि 7 जुलै, 2018 रोजी छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची वर्णी लागली.