लखनऊ -देशासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. मात्र, यामध्ये पुरेशा संरक्षक साधनांचा (पीपीई किट्स) अभाव असणे हे आपल्यासमोरील मोठे आव्हान असल्याचे मत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केले आहे.
देशामधील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी पुरेसे चाचणी किट्स उपलब्ध नाहीत. तसेच, डॉक्टरांकडे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडेही या विषाणूशी लढा देण्यासाठी पुरेसे पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. शिवाय देशातील गरीबांकडे पुरेसे अन्न नाही. आपल्या देशासमोरील ही महत्त्वाची आव्हाने आहेत, अशा आशयाचे ट्विट अखिलेश यांनी केले.
दिवे लावण्याच्या उपक्रमावर टीका..
देशातील परिस्थितीचे वर्णन करतच अखिलेश यांनी पंतप्रधानांनी केलेल्या दिवे लावण्याच्या आवाहनावरही टीका केली आहे. आपल्या आतील प्रकाश विझवून, बाहेरचा प्रकाश कोणाला प्राप्त झाला आहे काय? अशा आशयाचे ट्विट त्यांनी हिंदीमधून केले आहे.
रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन मोदींनी जनतेला केले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात गेल्या १२ तासांमध्ये कोरोनाचे ३०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४ वर पोहोचली आहे. यामध्ये ३,०३० अॅक्टिव रुग्ण आहेत. तर आतापर्यंत जवळपास २६७ लोकांवर यशस्वी उपचार झाले आहेत. तसेच देशात कोरोनामुळे ७७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा :दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४४५; आणखी रुग्ण वाढण्याची भीती..